महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभुमीत, सह्याद्रीच्या कुशीत, कडे कपारीत , सावित्री नदीच्या काठावर वसलेले एक नयनरम्य दृश्य असलेले एक टुमदार गाव म्हणजे फळसप गाव. पोलादपूरची सावित्री नदी ही सतत सळसळणारी अतिशय तिव्रगतीने समुद्राला मिळणारी एकमेव नदी आहे हे तिचे महात्म्य.
कोकणची जीवनवाहिनी असलेल्या सावित्री नदीच्या काठी दरवर्षी गणपती विसर्जनाचा भव्य सोहळा रंगतो.
फळसप गाव सावित्री नदी आणि बाणकोट खाडीच्या जवळ असल्याने पर्यटकांना येथे बोटिंगचा आनंद घेता येतो.
आई सोमजाई आणि जखमाता ही फळसप गावाची ग्रामदैवतं असून, गावाला येणाऱ्या संकटांपासून वाचवणारी आणि सुख-समृद्धी देणारी ही जागृत देवस्थानं आहेत.
ध्यात्मिक वातावरण : मंदिराचा परिसर अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे मंदिर भाविकांना एक वेगळीच आत्मिक शांती देते.
सांस्कृतिक वारसा : मंदिरात होणारी भजने, कीर्तने आणि पालखी सोहळा यामुळे गावाचा सांस्कृतिक वारसा आजही पिढ्यानपिढ्या जोपासला गेला आहे.
ग्रामपंचायतीचा सहभाग : मंदिराची स्वच्छता आणि परिसराचा विकास यासाठी ग्रामपंचायत फळसप आणि स्थानिक देवस्थान ट्रस्ट नेहमीच प्रयत्नशील असते
फळसप गावातील भक्त निवास हे भाविकांसाठी एक हक्काचे आणि सुरक्षित विश्रांतीस्थान आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे निवासस्थान श्री सोमजाई जखमाता गावदेवी मंदिराच्या सानिध्यात असून, येथे अतिशय शांत आणि आध्यात्मिक वातावरण लाभते. निसर्गरम्य कोकणचा आनंद घेत आध्यात्मिक दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या आणि तीर्थयात्रींच्या निवासासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.
वैशिष्ट्ये : येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छ, हवेशीर आणि सुसज्ज खोल्यांची उत्तम व्यवस्था अल्प दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या भक्त निवासाची निगा राखली जाते, ज्यामुळे प्रवाशांना घरगुती आदरातिथ्याचा अनुभव येतो.
फळसप गावाचा सर्वांगीण विकास हा येथील सक्षम शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून आहे. गावातील मुलांच्या उज्वल भविष्यासाठी प्राथमिक शिक्षणाची दर्जेदार सोय गावातच उपलब्ध आहे. गावातील मुख्य शैक्षणिक केंद्र म्हणजे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. ही शाळा अनेक वर्षांपासून गावातील पिढ्या घडवण्याचे काम करत आहे.
वैशिष्ट्ये : अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्रीडांगण आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण.
उपक्रम : शाळेत शैक्षणिक अभ्यासासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आणि प्रभात फेऱ्यांचे आयोजन केले जाते.
फळसप गावातील लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पूर्व-प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी अंगणवाडी केंद्र उत्तमरीत्या पार पाडत आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना खेळाच्या माध्यमातून, गाणी, गोष्टी आणि चित्रांच्या साहाय्याने शिक्षणाची गोडी लावली जाते. यामुळे मुलांचा प्राथमिक शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीचा पाया मजबूत होतो.
पोषण आहार : कुपोषण रोखण्यासाठी बालकांना, गरोदर महिलांना आणि स्तनदा मातांना पोषक आहार (उदा. सकस खिचडी, अंडी, दूध) पुरवला जातो.
आरोग्य तपासणी आणि लसीकरण : आरोग्य उपकेंद्राच्या मदतीने बालकांचे नियमित लसीकरण, वजन आणि उंचीची मोजणी केली जाते. यामुळे मुलांच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवले जाते.
माता मार्गदर्शन : बालकांचे संगोपन, स्वच्छता आणि आहाराबाबत मातांना वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाते.
कोकणच्या आणि विशेषतः फळसप गावाच्या सांस्कृतिक जीवनात 'शिमगा' (होळी) या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिमग्याचे मुख्य आकर्षण म्हणजे आपली ग्रामदेवता 'आई सोमजाई जखमाता' हिची सजवलेली पालखी. ढोल-ताशांच्या गजर आणि फाग अशा निनादात पालखी नाचवण्याचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. ग्रामस्थ एकत्र येऊन पारंपारिक पद्धतीने 'होळी' पेटवतात. यावेळी गावाला संकटातून वाचवण्यासाठी आणि समृद्धीसाठी 'गाऱ्हाणे' घातले जाते.
शिमग्यासाठी मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून 'चाकरमानी' मोठ्या संख्येने आपल्या मातीकडे ओढले जातात. यामुळे गावात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण होते.
"ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि आई सोमजाई जखमातेची पालखी... फळसपचा शिमगा म्हणजे भक्ती आणि आनंदाचा अनोखा संगम!"